*🖋️🖋️🖋️
सौ .रुपाली राहुल जाधव ,बागलाण
*एक राम भक्त ,सरस्वती उपासक*
*श्रीमद रामायण*
अदभुत ,अतुलनीय ,अवर्णनीय ,अविस्मरणीय ,अतिशय सुंदर अशी कलाकृती म्हणजे सोनी टिव्ही वर सध्या प्रसारित होणारे महाकाव्य श्रीमद रामायण .2024हे वर्ष खरोखर रामयुग सुरु झाल्या सारखं वाटलं .अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले आणि अवघी धरा राममय झाली .त्यात हि मालिका खरोखर तिचे प्रोमोज बघून ती प्रत्यक्षात कधी बघता येईल ह्याची उत्सुकता ,उत्कंठता तर होतीच .
स्वस्तिक production ने जन -सामान्यांच्या मनामनात असणारे महाकाव्य छोटया पडद्यावर आणायला प्रचंड मेहनत घेतली आहे .कलाकारांची योग्य निवड ,वेशभूषा ,सेट ,गायन ,वादन ,संगीत ,संवाद सगळं कसं एका पेक्षा एक सरस .तस बघायला गेलं तर छोट्या पडद्यावर रामायण बघण्याची माझी हि 3री वेळ .रामायण चे पूर्ण कथानक माहिती असून पुढे काय घडेल ?ह्या पेक्षा घडलेलं आपल्या समोर कसे येईल या बाबत उत्कंठता जास्त होती .
ह्यातील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे .ह्यातील एकही पात्र खोटं वाटत नाही .किंवा खलनायकही वाटत नाही .प्रत्येक घटनेची कारणं अगदी बारीक सारीक तपशीला सह स्पष्ट केली आहे .प्रत्येक भाग बघताना असे वाटते कि आपण प्रत्यक्ष त्या काळात जाऊन आपल्या डोळ्यांनी सर्व घडणारे प्रसंग बघतो आहे .
*राम* म्हणायला दोनच अक्षर पण त्या दोन अक्षरातच जीवनाचं सारं लपलेलं आहे .राम होणे सोपे नाही ,रामा साठी वेडं होणं सोपं नाही .रामा नामा सारखा दुसरा जप नाही कि रामा सारखे दुसरे तप नाही .एका रात्रीतून राजमार्ग सोडून वनमार्ग स्वीकारायला किती धैर्य ,संयम असायला हवा हे रामच जाणो .शत्रूसाठी रडणारा राम ,कोमल ,सुकुमार ,करुणामयी ,
वात्स्तल्यरुपी परंतु तितकाच पराक्रमी असणारा राम अशा रामाचं वेडं न लागेल तर नवलच .सुजय रेऊ ह्यांनी आपल्या मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांच्या भूमिकेला पुर्ण न्याय दिलेला आहे .जणु त्यांचा जन्मच ह्या पात्रासाठी झाला असे वाटते .
तसेच देवी सीता च्या भूमिकेलाही प्राची बन्सल ह्यांनी पूर्ण न्याय दिला आहे .देवी सीता आणि थोर विदुषी गार्गी ह्यांच्यातील विशेष चर्चा असणारा भाग आपल्या सर्वांच्या ज्ञानात वाढ करतो .मिथिला नगरीला ज्ञानाची नगरी का म्हणतात ह्याचा प्रत्यय येतो .भर सभेत जेव्हा जनक राजाला केवळ मुली असल्याचे बोलून दाखवले जाते .त्या प्रश्नांना जनक राजाने दिलेले उत्तर खरोखर अवर्णनीय आहे .इतकी महान संस्कृती ,सभ्यता असणारा आपला सनातन हिंदू धर्म नंतर स्त्री -भ्रूण हत्येकडे का वळला असेल ?असा मला प्रश्न पडतो .पण अतिशय सुंदर असणारा भाग सर्वानी बघायलाच हवा .
ह्या महाकाव्यातील संवाद लेखन अत्यंत प्रभावी आहे.आजच्या युगातील लहान थोर सर्वानाच समजेल अशी भाषा शैली वापरलेली आहे .
*,पवित्र पिनाक बाहुबल से नहीं आत्मबल से उठाया जा सकता है*
*परिवार से परिचय स्पष्ट होता है ,पराक्रम नहीं*
*वसंत के आने से ग्रीष्म का महत्व कम नही हो जाता*
असे एकाहून एक उत्तम असे सवांद. ह्या महानाट्याचे टायटल सॉंग हे अतिशय समर्पक आहे .त्याचे बोल ,चाल तसेच त्याच सादरीकरण अंगावर शहारे आणणार संगीत आणि स्वर .आपण केव्हा त्या स्वरांशी एकरूप होऊन जातो तेच कळत नाही .*सियाराम* ह्या शब्दातच असं काही गारुड आहे कि वर्णन करणे केवळ अशक्य .एकही गीत कंटाळवाणं नाही .आजची पिढी पोथी घेऊन पारायण तर करू शकणार नाही पण हे महानाट्य बघू तर शकतात .आपल्या देशाचा एक महान गौरवशाली इतिहास बघू तर शकतात .अशा कलाकृतींमुळे आपली संस्कृती ,सभ्यता ,सांस्कृतिक वारसा भावी पिढी कडे अगदी सहज संक्रमित होऊ शकतो .हे महानाट्य बघण्यासाठी सर्वाना प्रेरणा मिळावी म्हणून हा लेख प्रपंच .म्हणतात ना आनंद वाटला तर तो द्विगुणित होतो .हि कलाकृती बघताना आमचा स्वानंद ,आत्मानंद वाढला आणि हा लेख वाचून 4व्यक्तींनी जरी श्रीमद रामायण बघितले तर आमचा आनंद नक्कीच शतपटीने वाढेल .श्री रामांवर लिहिण्यासाठी माझी लेखणी कमी पडेल पण इथेच थांबून मी माझ्या लेखणीला विराम देते .
* *जय श्री राम*
Comments
Post a Comment