फादर्स डे निमित्त
बाप लेकीचं भावविश्व्
आमच्या वडिलांना आम्ही काका म्हणत असु अगदी शुन्यातून त्यांनी त्यांचं आयुष्य उभं केलं आम्ही पाच बहिणी एक भाऊ असा मोठा परिवार .
माझ्या आणि काकाश्रींच्या बाबतीत सांगायचे झाले तर काही घटना येथे नमूद करते लहानपणी आम्हा बहिणांना होस्टेलवर शिकण्यासाठी ठेवावं अशी त्यांची खूप इच्छा होती त्या प्रमाणे आम्ही होस्टेल बघूनही आलो पण मला काय दुर्बुद्धी झाली कि मी त्यांना म्हटले कि "काका तुम्हाला आमची लाज वाटते का ?इथे राहील नाही म्हणजे कोणाला कळणार नाही कि तुम्हाला किती मुली आहेत "माझ्या ह्या वाक्याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला परत तो विषय कधीच निघाला नाही .
त्यानंतर मला लहानपणी मलेरिया झाल्या मुळे दवाखान्यात ऍडमिट करावे लागले .त्यावेळी त्यांना पहिल्यांदाच हळवे झाल्याचे बघितले ."दणकून खायचं आणि दणकून काम करायचं हि त्यांची शिकवण मी आजही पाळते ".आपल्या घरी आलेल्या याचकाला कधीही विन्मुख जाऊ द्यायचे नाही असा त्याचा वसा होता तो आज आम्ही इमाने इतबारे पाळतो .
मी 12वीत असतांना पहिली कविता केली त्यांना ऐकविली त्यावर त्यांची प्रतिक्रिया ,"रूपा छान आहे पण कुठून पाहुन लिहिली नाही ना तरचं तुझी म्हण "ती छोटीशी कविता त्यांना इतकी आवडली होती आज ते असते तर असो .....
माझ्या बाबतीतली अजून एक आठवण म्हणजे माझं लग्न अवघ 15 दिवसांवर बाकी पण d.ed अपूर्ण ठेवून लग्न करत असल्यामुळे त्यांनी मला विचारले ,"रुपाली ,अजूनही सांग आपण लग्न नंतर करू "ह्या गोष्टीवर त्यांचे मित्रच चिडले "खरचं ती हो म्हटली तर काय करशील घरात लग्नासाठी पाहुणे जमले आहेत ." तो विषय तिथेच थांबला यथावकाश माझे लग्न व्यवस्थित पार पडले .
त्यांच्या विषयी मी जवळ जवळ 16 कविता लिहिल्या त्यातील हि एक
*देव *
काका जरी तुम्ही देव नव्हते पण
आमच्यासाठी देवापेक्षाही काही कमी नव्हते
लहानपणीच तुमच्या वरची मातृपितृछाया हरवली
पण त्याची झळ आमच्या पर्यंत कधीच नाही पोहचू दिली
श्युन्यातून सर्व भावविश्व् उभारलं
स्वतःच वेगळं असं प्रतिबिंब जनमानसात उमटवलं
नानाविविध उद्योगधंदे करून शेवटी
सराफी व्यवसायात नाव कमावलं
उद्योगाची घडी बसवता बसवता
समाजात वेगळं असं स्थान निर्माण केलं
काही लोक फक्त स्वतःसाठी जगतात
काही तर दुसऱ्यांसाठी जगवून दाखवतात
पण स्वतःबरोबर इतरांसाठी जगवुन दाखवुन
तुमच्या सारखे एक वेगळाच ठसा निर्माण करतात
स्वतःच्या मनातलं वादळ कधीही
आमच्या समोर येऊ न देता आम्हाला
एक मजबूत इरादे देऊन गेलात
तुमच्या शतपैलु व्यक्तिमत्वाचं गूढ
गणित आम्हाला सोडविण्यासाठी मागे ठेवून गेलात
असं काही नाही कि तुमच्या गुणांची महती
आम्हाला तुमच्या मृत्यूनंतर कळली
पण काका हे सर्व हितगुज तुमच्याशी शेअर करायच राहील हीच खंत मनात राहिली
वाटलं नव्हतं एव्हढ्यात तुम्ही आमच्यातून निघून जाल
एक अनामिक हुरहूर मनाला लावून जाल
काका तुमचा आवाज ऐकण्यासाठी हेमा वेडी होतेय
तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालण्यासाठी दिदी तुमची फोटोतील प्रतिमा खरी होण्याची वाट पाहतेय
माझ्या प्रत्येक कामामध्ये तुमच्या मार्गदर्शनाची वाट पाहतेय
काका ,एकदा तरी आमच्या हाकेला ओ द्या
कारण तुम्ही जरी देव नव्हता तरी आमच्या साठी देवापेक्षाही काही कमी नव्हता
सर्व शब्द सुमने काकाश्री चरणी अर्पण
-🖋🖋🖋🖋
सौ .रुपाली राहुल जाधव
बागलाण
Comments
Post a Comment