सौ .रुपाली राहुल जाधव
बागलाण
ह्या रस्त्यांवर बोलु काही ....
रस्ते हे आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक चांगल्या वाईट घटनांचे मूक साक्षीदार असतात .कोणाच्या लग्नाची वरात असो ,कोणाची अंतयात्रा असो ,पालखी मिरवणुक असो ,कोणतेही चांगले वाईट आंदोलन असो ते ह्या रस्त्यांवरच होतात .कोणाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर पायघड्या ,सडा -रांगोळ्या असतात तर कोणाचे स्वागत मुक मोर्चाने होते .लॉकडाऊन ,कर्फ्यूच्या काळात गर्दीने ओसंडणारे हेच रस्ते माणसांविना ओस पडलेले आपण पहिले .काहींचे आयुष्यच मुळी रस्त्यांवर सुरु होऊन रस्त्यांवर संपते .आपल्या मराठी भाषेत अनेक म्हणी ,वाकप्रचार ,सुविचार प्रचलित झाले आहे .मराठी ,हिंदी चित्रपटातील अनेक गाणी ह्या रस्त्यांवर आहे ,मनोज कुमार ह्यांचं हे हरियाली और रास्ता ,रुक जाना नाही तू कही हारके ,सडक चित्रपटातील गाणे अशी अनेक गाणी त्यासोबत त्यांची कहाणी हि रस्त्यांवर चित्रित झाली आहे ."ध्येय प्राप्तीसाठी आपण योग्य रस्ता निवडणे तसेच ह्या रस्त्यांवर आपलीसंगत चांगली असणे खूप महत्वाचे असते ."तर अशा ह्या रस्त्यांवर आज आपण बोलु काही ....
रस्ता ,पायवाट ,सडक अशा अनेक नावानी आपल्याशी परिचय आहे .काही रस्ते आयुष्यभरासाठी लक्षात राहतात .सध्या तर सर्वत्र रस्त्यांची कामे चालु आहेत .काही रस्त्यांची रखडलेली कामे तर कधी पूर्ण होतील हे त्या ब्रम्ह देवालाच ठाऊक .काही रस्तांवरचा प्रवास कंटाळवाणा ,जीवघेणा आणि खडतर वाटतो .उदाहरण सगळ्यांच्या नजरेसमोर आलीच असतील .
काही प्रवासातील रस्ते हे संपता संपत नाही असे वाटते .काही चिरपरिचित ,ओळखीचे वाटतात .खरोखर ज्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहेत त्यांवरचा प्रवास कधी संपतो ते कळतही नाही .बऱ्याच शहरातील ,गावातील रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केलेल्या गाड्या बघून उरलेल्या भागाला रस्ता म्हणावं का ?हा प्रश्न माझ्या सारख्या पामराला पडतो .
काही रस्त्यांच्या बाजुला लावलेले स्वच्छतेचे ,पाणी वाचवा सारखे जनजागृती करणारे फलक झळकत असतात .घाणीचे साम्राज्य ,वाहते पाणी बघून ह्या फलकांचा आणि आमचा काहीही संबंध नाही असेच दर्शवत असतात .काही लोक स्वतःच्या मालकीचा रस्ता समजून रस्त्याच्या मधोमध गाडी पार्क करून सहज बाजुला होऊन जातात .वाहतुकीचे नियम रस्त्यांवरील सिग्नल तर जणु मोडण्यासाठीच असतात .अपघाती वळण ,पुढे शाळा आहे हे बोर्ड देखील फक्त करमणुकीसाठी तयार केले आहेत असे वाटते .रस्त्यांवर असणारे टोल नाके आणि टोल हा एक लिखाणाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो .
ह्या रस्त्यांवरच्या प्रवासातील एक आवर्जुन नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ट्रकटर च्या मागे आपला रात्रीचा प्रवास कोणतेही इंडिकेटर नाही ,रेडियम लावण्याची तसदीही मालक ,चालक घेत नाही .ह्या बाबतीत काही ठोस उपाययोजना व्हायला हवी .
आपल्या देशातील रस्त्यांची जबाबदारी हि आपली स्वतःची आहे असे समजून त्यांची जोपासना आपण करायला हवी .किती दिवस आपण फक्त परदेशातील रस्त्यांचे कौतुक करणार ?आपल्या कडे का नाही होऊ शकत प्रत्येक गावापर्यंत पोहचणारा स्वच्छ ,सुंदर रस्ता ?सुसज्ज रस्ते ,रस्त्याच्या दुतर्फा झाडे ,कोणतेही ध्वनी ,वायू प्रदूषण न होता मोकळा श्वास घेणारे रस्ते .सौर उर्जेवर चालणारे रस्त्यांवरील दिवे ,अशा सुंदर ,स्वच्छ ,मजबुत रस्त्यांवरचे स्वप्न मला रोज पडत असते .कधी पूर्ण होणार हे त्या भगवंतालाच ठाऊक ?
Comments
Post a Comment