आस यात्रोत्सवाची : देवमामलेदार श्री यशवंत राव महाराजांचा यात्रोस्तव
कोरोनाच्या महाभयंकर स्थिती मुळे गेल्या वर्षी देवमामलेदार श्री यशवंत राव महाराजांचा यात्रोस्तव होऊ शकला नाही .खूप चुकल्या सारखं वाटलं .,खंत वाटली पण सर्वांचे हित लक्षात घेता तो निर्णय योग्य होता .पण बा भगवन्ता हि यात्रा म्हणजे नुसती यात्रा नसून अनेकांचे संसार ,उदरनिर्वाह त्या वर अवलंबुन आहेत .
रहाट पाळणे ,खास यात्रे निमित्त असणारे शो ,भांड्यांची दुकाने ,विविध जीवनउपयोगी वस्तुंचे दुकाने ,खेळण्यांची दुकाने ,इ सर्व छोटे छोटे व्यावसायिकांची ती जणु जीवन वाहिनीच .भगवंता कोणे एके काळी आपल्या सामर्थ्यावर आपण बागलाण वासियांसाठी सरकारी खजिना रिता करून दिला तसाच चमत्कार आजच्या कलयुगातही व्हवा अन कोरोनाच संकट टळून यात्रा नेहमीच्या जलोषात भरावी हि मज सारख्या पामराची इच्छा .यात्रेतील फुगा विकणारा नुसता फुगा विकत नसतो तर त्याचा
श्वास तो विकत असतो , यात्रेतील भांडी गल्ली आम्हा स्रियांची पावलं तिथंच जास्त रेंगाळणारी ,खेळण्या -पाळण्यांची गल्ली तरुणाई तिथं जास्त रमणारी ,भाजी आणि खाऊ गल्ली वृद्धांच्या आवडीची अशी एक ना अनेक गंमत आम्ही मिस करतो आहे .यात्रेची जी गंमत आमच्या पिढीनं अनुभवली ती गंमत मोठं मोठ्या मॉल मध्ये फिरणाऱ्या भावी पिढीला नाही समजणार .माझ्या मते तर मॉल म्हणजे हाय प्रोफाइल यात्राच आहे .
श्री देव मामलेदारांचा रथोस्तव ,पारायण ,सांगता तो गोडी शेव रेवडी ,जिलबी अन खरपूस पेढ्यांचा प्रसाद मनाला साद घालतो आहे .रथोत्सवातील बँड पथक ,लेझीम पथक ,आदिवासी नृत्य करणारे कलाकार ह्या सर्वांची भगंवत चरणी असणारी सेवा फळाला येऊ दे .कोरोनासारख्या महामारीच अवघ्या जगावरच संकट टळू दे .एका शासकीय अधिकाऱ्याच्या पुण्य तिथी निमित्त भारतातील एकमेव ठिकाणी भरणारी हि बागलाण तालुक्यातील यात्रा .महाराजां विषयी एक आठवण नमूद करावीशी वाटते .आमचे भाग्य थोर म्हणून आम्हाला शहरातील श्री महालक्ष्मी माता ,श्री अन्नपूर्णा माता ,श्री कालिका माता आणि श्री गुरुदेव दत्त इ .मंदिरातील देवतांचे आभूषण घडविण्याची सेवा मिळाली .
त्यातूनच श्री यशवंतराव महाराजांची रौप्य मूर्ती घडविण्याची प्रेरणा मिळाली .पण ते कार्य काही सहज सोपे नव्हते .आम्ही भगवंताची आराधना करून कार्यास सुरुवात केली आणि गतवर्षी आमची मनोकामना पूर्ण झाली .महाराजांच्या 50ग्रॅम ,70ग्रॅम ,100ग्रॅम च्या भरीव मूर्ती तयार झाल्या .त्याची योग्य प्रकारे सोशल मीडियावर जाहिरात केली .
फेसबुक वरची आमची जाहिरात बघून महाराजांच्या वंशज असणाऱ्या मुंबईच्या रती भोसेकर ह्यांनी आमच्या कडे मूर्ती बाबत चौकशी केली .प्रथम मनात शंका होती कि त्यांना आमची हि कलाकृती आवडेल कि नाही ?परंतु त्यांनी मूर्ती बघून खूपच कौतुक केले आणि मूर्तीची ऑर्डर दिली .गेल्या वर्षी नाशिक येथील गंगाघाटावरच्या महाराजांच्या समाधी मंदिरात आम्ही उभयतांनी त्यांना मूर्ती पोहच केल्या .आमच्यासाठी खूपच सुखद अनुभव ठरला तो .हा अनुभव सर्वांसोबत वाटावा वाटला म्हणून हा लेख प्रपंच .
"यशवंतराव महाराजांची लीला
काय वर्णावयाची
लाभले भाग्य आम्हास
त्यांची रौप्य मूर्ती घडवावयाची "
तर अशा ह्या कर्मयोग्याला माझा मानाचा मुजरा .बागलाण मधील त्यांचे वास्तव्य ह्या सत्यायन नगरीला पवित्र करून गेले .गोरगरिबांसाठी त्यांनी खजिना रिक्त करून दिला .एका शासकीय अधिकाऱ्याने आपल्या वर्तनाने जनमानसात संत रुपी स्वतःचा ठसा उमटवला .हा आदर प्रेम असाच वाढू दे .भगवंत दर्शनाची आस मनात ठेवून माझ्या लेखणीला विराम देते .धन्यवाद
-©️®️सौ .रुपाली राहुल जाधव

Comments
Post a Comment